बँकांच्या सुट्ट्या आणि पोटदुखी

           नमस्कार मित्रांनो,

           आत्ताच बहुचर्चित "मार्च एंड" पार पडला. खरं तर हा लेख मला मागच्याच आठवड्यात लिहायचा होता, परंतु मी सुद्धा आर्थिक वर्ष अखेरीच्या गडबडीत अडकलो असल्यामुळे वेळ मिळाला नाही. आज खूप दिवसांनंतर निवांत असल्यामुळे खास वेळ काढून लिहायला बसलो.

         तर आता मुद्द्यावर येवुया, मागील काही आठवडे आपल्या देशातील "Whatsapp University" या अत्यंत प्रतिष्ठित विद्यापीठात एक बातमी फिरत होती. "आपले काम लवकर उरकून घ्या, मार्च आणि एप्रिल महिन्यात अमुक दिवस बँक बंद" अशा आशयाची ती बातमी होती. आणि ती बातमी वाचून "Whatsapp" चे सुशिक्षित (?) वाचक बँकेत आपले काम उरकून घेण्यासाठी गर्दी करत होते. (येथे नोंद घ्यावी की त्यांना Whatsapp वापरता येते पण बँकेची सुरक्षित इंटरनेट बँकिंग वापरता येत नाही.) ही बातमी खरी की खोटी याची शहानिशा न करता लोक बँकेत गर्दी करत होते. एकीकडे सरकार गर्दी टाळण्याचे आवाहन करत होते, तर दुसरीकडे Whatsapp, Facebook, Tiktok, PubG वापरणारे, खिशात २-२ Android, Apple बाळगणारे, Royal Enfield आणि तत्सम सुपर बाईक घेऊन फिरणारे, उन्हापासून बचावासाठी Rayban घालणारे अंगठेबहाद्दर (येथे मोबाईल अंगठ्याने चालवतात म्हणून हा शब्दप्रयोग) छोट्या छोट्या कामांसाठी बँकेत गर्दी वाढवत होते.

           आता जो संदेश फिरत होता त्या बद्दल बोलूयात, त्यात सांगितले होते की २७, २८, २९ मार्च या सलग ३ दिवस बॅंका बंद आहेत. मित्रांनो, २७ आणि २८ या सुट्ट्या तर कायम येणाऱ्या सुट्ट्याच होत्या (४था शनिवार व रविवार), फक्त १ दिवस म्हणजे २९ मार्च ही एकच सुट्टी आली होती, आणि अर्थवर्षाखेर असल्यामुळे नक्की किती बँक कर्मचाऱ्यांनी ही सुट्टी अनुभवली? मी स्वतः या सुट्टीच्या दिवशी सुद्धा बँकेत होतो. महाराष्ट्रातील काही जिल्हाधिकाऱ्यांनी तर या सलग ३ दिवस बँक चालू ठेवण्यासाठी आदेश काढला होता आणि बँक कर्मचाऱ्यांनी तीनही (२७ ते २९ मार्च) दिवस बँकेत जाऊन काम केले. पुढे त्या संदेशात म्हटले होते की ३१ मार्च या दिवशी बँकेचे कामकाज ग्राहकांसाठी बंद राहील. आता मी तर म्हणेन की ज्याने कुणी हा संदेश बनवला आणि पुढे पाठवला त्याचा सत्कारच व्हायला हवा. आत्तापर्यंत कधी आपण ३१ मार्च ला बँक बंद बघितली आहे का? मी काही उदाहरणे देईल, ३१ मार्च २०१४, सोमवार या दिवशी गुढीपाडवा होता आणि सुट्टी होती, तरीही बँका या सरकारी कामकाजासाठी चालू होत्या. ३१ मार्च २०१९ ला रविवार असूनही बँका चालू होत्या. इतकेच काय तर ३१ मार्च ला बँका या रात्री १२ वाजेपर्यंत चालू असतात. मी स्वतः या वर्षी थेट १ एप्रिल ला पहाटे २ वाजता घरी आलोय. मग ठरवा आता त्याचा कसा सत्कार करायचा ते.

              आपण एक वेळेला समाज माध्यमांमधील अशा संदेशाकडे दुर्लक्ष सुद्धा करू पण आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता अशा बातम्या देते तेव्हा कीव येते. आणि कोणतीही शहानिशा न करता अशा बातम्यांना प्रसिद्धीही दिली जाते. यामागे नक्की कोणती मानसिकता असते याचा जरा शोध घेण्याचा मी प्रयन्त केला तर वेगळेच सत्य समोर आले. म्हणजे जेव्हा एखादे वर्तमानपत्र किंवा दूरचित्रवाणी बातमी देते की अमुक महिन्यात इतके दिवस बँक बंद, तेव्हा खरे तर त्यातील फक्त १-२ दिवसच बँक बंद असते. म्हणजे कसे ते बघा, समजा एका महिन्यात ४ शनिवार व ४ रविवार आहेत तर ६ दिवस बँक बंदच असणार पण बाकीच्या राज्यांमध्ये काही सुट्ट्या असतात तेही बातमीत दाखवले जाते. उदा., छट पूजेला बिहारमध्ये सुट्टी असते पण महाराष्ट्रात नसते, तरीही आपले महाशय महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात बातमी टाकतात की या दिवशी बँक बंद. आता तुम्हीच विचार करा यावर हसावे की रडावे?

              मित्रांनो, हे सर्व बाजूला ठेवा, पण आपल्या भारतात मागील वर्षीपासून कितीतरी गोष्टी बंद आहेत, कितीतरी गोष्टी फक्त ऑनलाइन चालू आहेत, मग प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या बँकेत येण्याचा अट्टाहास का? जेव्हा जेव्हा सरकारी कार्यालय, शाळा ह्या ५०% उपस्थितीवर चालवाव्या असा आदेश येतो तेव्हा तेव्हा बँकेत गर्दी वाढलेली दिसते. मग समजते की आज ज्यांना WFH आहे ते बँकेत स्वतःचे काम उरकायला आलेत. यांना एव्हडेही कळत नाही का की सरकारने WFH हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेय, तुमचे काम उरकण्यासाठी नाही. माझी सरकारलाही विनंती असेल की अशा कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. आपल्या भारतात न्यायालयही काही दिवस सुट्टी उपभोगतात, मग बँकेच्याच बाबतीत इतकी ओरड का? की न्याय नाही मिळाला तरी चालेल पण बँक बंद म्हणजे जगबुडी होणार असे काही आहे का? आजच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात खरच बँकांच्या सुट्टीचा सामान्य माणसावर परिणाम व्हायला हवा का? आज काल तर सर्व बँकिंग हातातल्या मोबाईल मध्ये चालते. पैसे भरणे, काढणे सर्वांसाठी मशीन (२४x७) उपलब्ध आहेत. अगदी भाजी घ्यायला गेलो तरी UPI चा QR Code दिसतो. मग खरच बँकांच्या सुट्टीचा आपल्यावर प्रभाव पडतो का? बँक कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत, कोरोना काळातही त्यांची सेवा अखंड चालूच होती, कितीतरी सहकारी त्यांनीही गमावलेत. मग जर महिन्यातून एखादी सुट्टी त्यांनी उपभोगली (त्या दिवशी इतरही कार्यालय बंद असतात बरं का) तर कुठे बिघडले?

लिहिण्यासारखे खूप काही आहे पण कोरोनाच्या लढाईत जीव गमावलेल्या माझ्या सहकाऱ्यांना आदरांजली वाहून इथेच थांबतो. जाताना फक्त इतकेच सांगेन,

घरी राहा, सुरक्षित राहा

आपला

हर्षद रविकांत पाबळकर

उपाध्यक्ष, स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, मुंबई मंडळ

केंद्रीय समिती सदस्य, नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईस

टीप: हा लेख माझ्या नावसाहित पुढे पाठवायला हरकत नाही.

तळटीप: आपल्यालाही सरकारने WFH सांगितले असेल तर घरीच थांबा, उगाच दुसऱ्या कार्यालयात जाऊन तेथील गर्दी वाढवू नका

Comments

  1. हष॔द..छान. .असे बरेच issues आहेत. .बॅक कर्मचारी कोण कोणत्या परिस्थितीत काम करतो याबाबत टप्प्या टप्प्यात लिहित रहा. . Good luck. .

    ReplyDelete
  2. छान मुददा मांडला हर्षद

    ReplyDelete
  3. हर्षद अतिषय चांगल्या पद्धतीने तू हा विषय मांडला आहेस. प्रसार माध्यमातून सुद्धा बऱ्याच वेळा विपर्यस्त बातम्या दिल्या जातात आणि त्यामुळे नाहक बँक कर्मचाऱ्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो.

    ReplyDelete
  4. 31March ला बँका बंद राहतील असे ज्यावेळी साम टीव्ही वर सांगितले जात होते त्यावेळी त्या चॅनल ला कॉल करून मी खूप बोलली की उगीच चुकीच्या बातम्या देवून लोकांची दिशाभूल करण्याबद्दल आम्ही तुमची तक्रार करू, त्यावेळी त्यांची बँकांच्या सुट्ट्यांची न्यूजच बंद झाली होती

    ReplyDelete

Post a Comment